
इचलकरंजी : श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने अंगारकी संकष्टीच्या पावन सोहळ्याच्या दिनानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसरात भक्तिभावाने नटलेला सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वरदविनायकाच्या भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर भक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी सकाळी ८ वाजता नित्य आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८:३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अथर्व शीर्ष व इचलकरंजी परिसरातील महिला भजनी मंडळांकडून भजन सेवा सादर केली जाणार आहे. या माध्यमातून भक्तगणांना पारंपरिक भक्तिसंगीताचा अनुभव घेता येणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत शाबू खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून भाविकांसाठी हे प्रसाद वितरण खुल्या स्वरूपात असणार आहे. सायंकाळी ७ वाजता पुन्हा एकदा नित्य आरती होईल. त्यानंतर रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी संकष्टी चंद्रोदयाच्या शुभक्षणी महाआरती होणार आहे. हा सोहळा भक्तांच्या गर्दीने भारावलेला असणार आहे.