
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची परंपरा आणि विचारांनी तरुण पिढी घडली पाहिजे. त्यांच्या राष्ट्रभक्ती धर्म भक्ती आणि स्वतंत्र भक्तीचे उपासना समस्त हिंदू समाजाने स्वीकारली पाहिजे, यासाठी गडकोट मोहिमांची आवश्यकता आहे. यावेळची मोहीम श्री लोहगड ते श्री भीमगड मार्गे श्री राजमाचीगड असून तरुणांनी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन गजानन महाजन गुरुजी यांनी येथे केले. येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने घटस्थापनेपासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीची सांगता तुळजाभवानी देवीच्या आरतीने आणि हजारों तरुणांच्या साक्षीने झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील तरूणांत राष्ट्र, हिंदू धर्माबद्दल प्रेम जागृत व्हावे, तसेच सर्व तरुणांनी राजकारण विरहित एकाच परमपवित्र भगव्या ध्वजाच्या छत्रछायेखाली यावे, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात गेल्या ३४ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. इचलकरंजी शहरातही त्याचे नियोजन केले होते. यंदाचे २७ वे वर्ष होते.

घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कॉ. मलाबादे चौकातून दररोज पहाटे साडेपाच वाजता श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ होत होता. यात हजारो तरुणांचा पारंपरिक वेशात सहभाग होता. दौडमध्ये राष्ट्रभक्तीपर गीते, शिवछत्रपतीं व शंभुमहाराज यांच्यावर आधारित गीते, श्लोक, भारतमाता, अंबामाता, दुर्गामाता, गंगामाता, जिजाऊ माँसाहेबांचा जयघोष करत शहरातील विविध मंडपातील तसेच मंदिरातील दुर्गामाताचे दर्शन घेऊन साडे तीनशे वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी दुर्गामातेकडे जे मागणे मागितले होत अगदी त्याच भावनेने दुर्गामातेकडे मागणे मागितले गेले. त्यानंतर दौडचा समारोप होत होता.

विजयादशमीला दसऱ्यादिवशी श्री दुर्गामाता दौडच्या समारोपासाठी पहाटे हजारो युवक, महिला पारंपरिक वेशभूषेत मलाबादे चौकात एकत्र आले. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, नेत्रपाल शर्मा, पैलवान अमृतमामा भोसले, ॲड. अनिल डाळ्या, संतोष सावंत, पुंडलिक जाधव, शेखर कस्तुरे, मयूर चिंदे, कार्यवाह प्रसाद जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यानंतर दौड हवामहाल बंगला मार्गे श्री शिवतीर्थ, नारायण पेठ, गांधी कॅम्प, सुतार मळा चौक, सरस्वती मार्केट, मंगळवार पेठ, झेंडा चौक, श्रीमंत ना. बा. घोरपडे चौकमार्गे पुन्हा मुख्य रस्तामार्गे मलाबादे चौकात येऊन दौडीची सांगता झाली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी ठिकठिकाणी या दौडचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा आणि मध्यभागी रांगोळ्या काढून, चौकाचौकात फटाके वाजवून, शिवशंभूंच्या मुर्तीची पुजा करून तसेच शिवकालीन इतिहासाच्या व मावळ्यांच्या प्रतिमा उभा करून दौडचे स्वागत झाले. यावेळी तरुण शिवकाळातील पारंपारिक शस्त्र घेऊन दौडमध्ये सहभागी झाले होते. या शस्त्रांचे पूजन ठिकठिकाणी केले गेले.

शेवटी देव, देश आणि धर्म या तीन तत्वावर आधारलेली ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आहे, या संघटनेतील सर्व उपक्रम सर्वच वयोगटातील हिंदू नागरिकांनी राबवावेत, यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही गजानन महाजन गुरुजी यांनी केले. यावेळी मलाबादे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास वानर सेनेकडून कर्तव्य निधी देण्यात आले. दुर्गामाता दौडीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.