पंचगंगा नदी गाळमुक्त झाल्यास महापूराचा धोका टळणार – आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी गाळमुक्त झाल्यास दरवर्षी भेडसावणारा महापूराचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे  तातडीने पंचगंगा नदीतील गाळ काढण्याचे काम तातडीने व काटेकोरपणे हाती घेण्यात यावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.


इचलकरंजी शहराला दरवर्षी सतावणारा महापूराचा धोका कायमस्वरुपी संपावा म्हणून पंचगंगा नदीतील गाळ काढण्यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी थोड्या प्रमाणात गाळ काढण्यात आल्यामुळे तसेच कमानीच्या यशोदा पुलामुळे यंदा महापूराचा प्रश्‍न भेडसावला नाही. हा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागून पूरग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरुन शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत महत्वाची बैठक झाली. बैठकीस इचलकरंजी महापालिका आयुक्त सौ. पल्लवी पाटील, इरिगेशन विभागाचे श्री. म्हेत्रे व सौ. माने, गौण खनिज विभागाचे थोरात, महापालिका पाणी पुरवठा अभियंता बाजीराव कांबळे तसेच नाना पाटील, संतोष कोळी उपस्थित होते.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी अधोरेखित करताना कित्येक वर्षांपासून पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शहराला महापूराचा सातत्याने धोका निर्माण होत आहे. पंचगंगा पात्रातील गाळामुळे पाणी वेगाने नागरी वस्तीत शिरत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतर करावे लागते तर आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे पंचगंगा नदी गाळमुक्त करणे अत्यंत गरजेचे असून हे काम तातडीने करण्यात यावे. त्यामुळे इचलकरंजी शहराला महापूराच्या संकटातून कायमचा दिलासा मिळेल, असे सांगितले.
यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच भविष्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासह होणारे नुकसान टाळण्यासाठी  गाळ काढण्याची प्रक्रिया गतीमान करण्यावर भर देण्यात आला. या  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *