ट्रम्प यांनी केली फक्त इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा

इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू होते. या युद्धात थेट अमेरिकेनेही उडी घेतल्याने संपूर्ण समीकरणच बदलून गेले आणि तणाव वाढला. इराण च्या अणु ठिकाणांवर अमेरिकेने हल्ला केला. यानंतर अनेक देशांनी अमेरिकेचा निषेध देखील केला. इराणनेही यानंतर अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली तरीही हे युद्ध मिटवण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका कतारची आहे. कतारच्या मध्यस्थीमुळेच हे शक्य होऊ शकले आहे. इराण आणि इस्त्रायलमध्ये शस्त्रसंधी लागू झाल्याने पश्चिम आशियाला मोठा दिलासा मिळालाय.

कतारचे अमीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे इराण आणि इस्रायलमधील 12 दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबला आहे. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी अमेरिकेच्या वतीने प्रस्तावित केलेल्या युद्धविरामासाठी इराणला तयार केले. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील शस्त्रसंधीच्या मध्यस्थीसाठी कतारच्या अमीर यांचे आभार मानले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वेंस यांनी कतारच्या अमीर यांच्याशी संपर्क साधून त्यांना इस्रायल-इराणमध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इराणशी बोलण्याचे काम केले. इराणच्या सर्वोच्च नेत्याशी संपर्क साधून प्रस्तावित युद्धविरामासाठी त्यांची सहमती मिळवली. ट्रम्प यांनी कतारच्या अमीर यांना सांगितले की, इस्रायल युद्धविरामासाठी तयार झाला आहे. तुम्ही इराणशी चर्चा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *