इचलकरंजीच्या कु. निवेश नितेश पाटीलला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रौप्य पदक

महाराष्ट्र राज्य योगासन असोसिएशन यांच्या वतीने संगमनेर (अहिल्यानगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर योगासन स्पर्धेत इचलकरंजी शहरातील व्यंकटराव हायस्कूलचा होतकरू खेळाडू कु. निवेश नितेश पाटील याने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट योगासन सादरीकरण करत कु. निवेशने संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक 🥈 मिळवले आहे. या उल्लेखनीय यशामुळे इचलकरंजी शहराच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या जोरावर कु. निवेशची येत्या फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगड येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही निवड त्याच्या सातत्यपूर्ण सरावाचे, मेहनतीचे आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाचे फलित असल्याचे क्रीडा तज्ज्ञांनी सांगितले.
कु. निवेशच्या या यशामागे व्यंकटराव हायस्कूलचे मोठे योगदान आहे. संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. खराडे सर, पर्यवेक्षक श्री. बरगाले सर, तसेच क्रीडा शिक्षक श्री. माळी सर यांनी त्याला सातत्याने प्रोत्साहन, मार्गदर्शन व योग्य प्रशिक्षण दिले. यासोबतच त्याच्या पालकांनीही वेळोवेळी दिलेले पाठबळ आणि प्रेरणा त्याच्या यशात मोलाची ठरली आहे.
कु. निवेश नितेश पाटीलच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा, शिक्षकवृंद, क्रीडा प्रेमी व नागरिकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, आगामी खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *