बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची दिशा देणाऱ्या आणि अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील मतमोजणी आज सुरू झाली आहे. पहिल्याच फेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मात्र, इतर उर्वरित 20 जागांचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. अजितदादांचा विजय झाला असला तरी या निवडणुकीत ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या कलानुसार मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
माळेगाव कारखान्याच्या सत्तेसाठी चार पॅनेल्समध्ये जोरदार चुरस असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळ ठोकून या निवडणुकीत प्रचार केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचं नेतृत्व असलेले बळीराजा बचाव पॅनेल, शरद पवारांचे माजी सहकारी चंद्रराव तावरे यांचं नेतृत्वातील सहकार बचाव पॅनेल यांच्यात चुरस आहे. या निवडणुकीत एकूण 19 हजारांहून अधिक मतदार असून, 88.48 टक्के मतदान झालं आहे. कारखान्याच्या संचालक मंडळासाठी 90 उमेदवार रिंगणात असून, मतदार आज एकूण 21 संचालकांची निवड करणार आहेत.