खोदकामामुळे इचलकरंजीतील रस्त्यांची दुरवस्था; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा यांची मागणी अखेर प्रशासनाने मान्य केली

इचलकरंजी : शहरातील भुयारी गटार योजना, केबल टाकणे, गॅस पाईपलाईन तसेच विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने शहरातील खराब झालेल्या रस्त्यांवर पॅचवर्क करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनात पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि गल्ली-बोळांमधील खड्डे बुजविण्याची, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. खोदकामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांवरील खड्डे, उघडी मॅनहोल्स आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांबाबत संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने विविध भागांमध्ये रस्ते दुरुस्ती आणि डांबरी पॅचवर्कची कामे हाती घेतली आहेत.
शहरातील नागरिकांनीही रस्ते दुरुस्तीच्या कामाचे स्वागत केले असून पावसाळ्यापूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून शहरातील सर्व रस्ते वाहतुकीस योग्य व सुरक्षित बनवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.