
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सावर्डे येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावातून भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई, जयघोष आणि उत्साही वातावरणात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत लोकमातांना अभिवादन केले.
मिरवणुकीदरम्यान लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्यात आला. समाजातील मान्यवरांनी त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, न्यायप्रिय प्रशासनाचा व समाजहितासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
समस्त धनगर समाज यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवा वर्ग, महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच शिव स्वामी सर्वहिताय बहुद्देशीय संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने अध्यक्ष राहुल सावर्डेकर, सचिव प्रा. नितीन कदम तसेच संचालक योगेश कांबळे व उमेश पाटील यांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण गावात जयंती उत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
“लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे न्याय, लोककल्याण आणि समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले