आयुष्मान भारत योजनेची विशेष मोहीम राबविण्याचीही मागणी

इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली वैद्यकीय बिले तात्काळ अदा करण्यात यावीत तसेच आयुष्मान भारत योजना अंतर्गत सर्व पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजपा इचलकरंजी पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मा. महापौर, मा. आयुक्त आणि मा. उपमहापौर यांना दिलेल्या निवेदनात दाभोळे यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी गंभीर आजारांवरील उपचारासाठी स्वतःच्या खिशातून मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र उपचारानंतरची वैद्यकीय बिले अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्यांच्या कुटुंबीयांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या प्रशासनाचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजना ही कर्मचारी वर्गासाठी अत्यंत लाभदायक असून, अनेक कर्मचाऱ्यांचे अद्याप योजना कार्ड नोंदणी झालेले नाही. त्यामुळे महानगरपालिका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सर्व प्रलंबित वैद्यकीय बिले तात्काळ GST भरपाई अनुदानातून मिळणाऱ्या निधीतून अदा करण्यात यावीत वैद्यकीय बिल मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा भविष्यात वैद्यकीय बिले प्रलंबित राहू नयेत यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी.
आयुष्मान भारत योजना अंतर्गत विशेष शिबिर घेऊन सर्व कर्मचाऱ्यांची कार्ड नोंदणी करावी.कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठी कायमस्वरूपी समन्वय समिती स्थापन करावी.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.