माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी; इचलकरंजी भाजप शिष्टमंडळाची मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे भेट

इचलकरंजी येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी विधानसभा सदस्य सुरेशराव हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईत महत्त्वाची भेट घेतली. काल दादर येथील वसंत स्मृती येथे हे शिष्टमंडळ पोहोचले होते.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक तानाजी बाळू पोवार यांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपली मागणी मांडली. या भेटीला राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक तसेच कोल्हापूर जिल्हा भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिष्टमंडळाने माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी केलेले कार्य, त्यांचा व्यापक जनसंपर्क तसेच संघटन बांधणीतील योगदान याची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली. त्यांच्या राजकीय अनुभवाचा व पक्षनिष्ठेचा विचार करून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. योग्य त्या स्तरावर या मागणीचा विचार केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

या शिष्टमंडळामध्ये जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, सतीश पंडित, शहराध्यक्ष शशिकांत मोहिते, नगरसेवक मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान व पोपट पुजारी यांचा समावेश होता. या भेटीमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *