पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना धक्का दिला आहे. राज्य मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांच्या खासगी सचिव (पीए) आणि अधिकारी विशेष कार्य (OSD) नियुक्त्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत परवानगी नाकारली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून आधीच दिले गेले होते. मात्र हे अधिकारी तिथे हजर झाले नाहीत, त्यामुळे आता सरकारने थेट नोटिसा बजावत कारवाईचा बडगा उगारला आहे.
कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याने या खासगी सचिवांची, विशेष अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.मंत्र्यांकडे सेवा देत राहिलेल्या सचिवांना बजावलेल्या नोटिसांमध्ये ‘बेकायदेशीरपणे आपण त्या ठिकाणी कार्यरत आहात’ असा ठपका ठेवत, तात्काळ मूळ खात्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.