भारतीय विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंत हेडिंग्ले टेस्ट दरम्यान ICC आचार संहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात पंतने बॅटने दोन शतके झळकावली, परंतु इंग्लंडच्या पहिल्या डावात मैदानावर त्याच्या वर्तनाबद्दल त्याला फटकारण्यात आले आहे. पंतने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविण्याशी संबंधित आहे.
ऋषभ पंतने कोणता गुन्हा केला
याव्यतिरिक्त, पंतच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. गेल्या 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा आहे. इंग्लंडच्या डावाच्या 61 व्या षटकात हॅरी ब्रूक आणि बेन स्टोक्स फलंदाजी करत असताना ही घटना घडली. पंत पंचांसोबत चेंडूच्या स्थितीबद्दल चर्चा करताना दिसला. बॉल गेज तपासल्यानंतर पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिला तेव्हा विकेटकीपरने पंचांसमोर चेंडू जमिनीवर फेकून आपली नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाने सतत बॉल बदलण्याची मागणी अंपायरकडे केली असताना देखील अंपायरने बॉल बदलण्यास नकार दिला आणि त्यानंतर ही घटना घडली.