ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या-बसल्या करा ही योगासनं

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम, योगसाधना याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आता लोकांना दिवसातून 8 ते 9 तास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. त्यामुळे खांदे, मान, पाठ, कंबर आणि पाय दुखणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. या आरोग्य समस्या टाळण्यासाठी दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. चला तर मग आज आपण काही योगासनांबद्दल जाणून घेऊ, ज्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून करता येतात.

आपल्या दैनंदिन जीवनात योगसाधनेला खूप महत्त्व आहे. योगासन केल्यामुळे तुमच्या स्नायूंची ताकद तर वाढतेच, शिवाय शरीर लवचिक बनते आणि स्नायूंच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. बराच वेळ एकाच जागी बसल्याने कामातही मन लागत नाही. त्यामुळे थोडा वेळ शरिराला आराम देणे गरजेचे असते.

उर्ध्व हस्तासन करा

तुम्ही खुर्चीवर बसून उर्ध्व हस्तासन करू शकता. यामध्ये खुर्चीवर बसताना पाठीचा कणा सरळ ठेवा. आणि ताडासनात केल्याप्रमाणे तुमचे दोन्ही हात वर घ्या. हातवर घेताना श्वास घ्या. मग काही सेकंदांसाठी याच स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडताना तुमचे हात सामान्य स्थितीत आणा. तुम्ही हे 5 ते 10 वेळा करू शकता.

गोमुखासन

खुर्चीवर बसून तुम्ही गोमुखासन करू शकता. ज्यामुळे तुमची मुद्रा सुधारण्यास मदत होते. पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. यानंतर उजवा हात वरच्या बाजूने पाठिच्या दिशेने न्या मग डावा हात कंबरेच्या बाजूने पाठिच्या दिशेने न्या. यानंतर दोन्ही हात एकमेकांना मिळवा.

मानेचे व्यायाम

तज्ज्ञांच्या मते खुर्चीवर बसून सतत काम केल्याने पाठीवर, मानेवर ताण येतो. यामुळे मानेचे व्यायाम करणे गरजेचे आहे. मानेच्या व्यायामामुळे मानदुखीपासून आराम मिळतो. यासाठी तुमचे डोके पुढे वाकवा नंतर आरामात वर पाहा आणि नंतर डावीकडे आणि उजवीकडे पाहा. हे 5 ते 7 वेळा करा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

1. नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. 

2. योगामुळे तणाव कमी होतो, लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात आणि एकाग्रता वाढते.

3. योगामुळे चांगली झोप लागते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *