
खाजगी दवाखान्यातून उपचार घेऊन घरी परत जाणाऱ्या 75 वर्षीय वसंतराव भाऊसाहेब हुगे या पादचाऱ्यास खाजगी आराम बसणे धडक दिल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ते शिरोळ गावचे रहिवासी होते. हा अपघात आज दुपारी दोनच्या दरम्यान इचलकरंजी अतिग्रे रोडवर माणगाव फाटा इथं झाला. माणगाव फाटा हे अपघाताचे केंद्र बनले असून अपघात नित्याचेच होत आहेत या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
शिरोळ तालुक्यातील शिरोळ इथल्या गणेश नगर मध्ये राहणारे 75 वर्षीय वसंतराव भाऊसाहेब हुगे हे आपल्या पत्नीसह हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आज सकाळी आले होते. उपचार आटोपून दुपारी दोनच्या दरम्यान माणगाव फाटा हॉटेल सुकून समोरून रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून इंचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव खाजगी आराम बस क्रमांक MH 09 FL 0456 ने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेमधून त्यांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घोषित केले.या वेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक तेजस कांबळे हे करत आहेत.
माणगाव फाटा या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची आणि वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. वाहनांना गती अधिक असल्याने या ठिकाणी अपघात नित्याचेच बनले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली आहे पण सार्वजनिक बांधकाम खात्याने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या बे जबाबदारपणामुळे मात्र नागरिकांचा जीव जात आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. वाहनचालकाबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.