
इचलकरंजी शहरातील भीम शक्ति लेबर संघटनेच्या वतीने आज इचलकरंजीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून एल.एल.पी. या खासगी ठेकेदार कंपनीवर तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले.
इचलकरंजी शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या एल.एल.पी. या खासगी ठेकेदार कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे संपूर्ण इचलकरंजी शहरात डेंग्यूसह अन्य रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात आज भीम शक्ती लेबर संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे ठेकेदार कंपनीविरोधात तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. ६ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या ठेकेदार कंपनीला शहरातील कचरा व्यवस्थापन व सफाई कामकाज अधिक काटेकोरपणे पार पाडण्याबाबत आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कंपनीकडून कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. राजीव गांधी झोपडपट्टी, जाधव मळा, लाल नगर, लाखे नगर आदी भागात साचलेला कचरा, उघड्यावर पडलेले कुजलेले पदार्थ व वाढती डेंग्यू मच्छरांची संख्या यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही या कंपनीकडून कामात कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. दरम्यान, आज भीम शक्ती लेबर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेला याबाबतचे निवेदन देत सात दिवसांच्या आत ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी अन्यथा महापालिकेच्या दारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, राहुल जावळे, सनी जावळे, महेश लाखे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.