
साखर उद्योगातील चार दशकाहून अधिक कामकाजाच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार नवीदिल्ली येथील कार्यक्रमात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि; नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नवीदिल्ली येथील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे संस्थेचे वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, सौ. किशोरी आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, कारखान्याचे अधिकारी तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर डॉ. सीमा परोहा, डीसीएम श्रीरामचे सीईओ आर. एल. तमक, उद्योगपती रणजित पुरी, महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील, नॅशनल फेडरेशनचे संचालक अनित कोरे, साखर उद्योगातील विविध तज्ञ, अभ्यासू मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था आपली शताब्दी साजरी करत असून अशा ऐतिहासिकप्रसंगी हा पुरस्कार मिळणे ही कारखान्यासाठी एक अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. संस्थेची स्थापना 1925 साली झाली असून गेल्या 100 वर्षांपासून ही संस्था साखर उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. साखर उत्पादन, प्रक्रिया, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय शाश्वतता यासारख्या विविध क्षेत्रांत मार्गदर्शनपर कार्यशाळा, संशोधन परिषद आणि प्रकाशने यांद्वारे साखर उद्योगाला दिशा देत आहे.
मनोहर जोशी यांनी सहकारी साखर उद्योग, सहकारी बँकिंग व ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ नवीदिल्ली येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय काम पाहिलेले आहे. त्यांच्या या कार्यामुळे साखर उद्योगाला नवी दिशा व ऊर्जा मिळाली आहे. या यशामागे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाो चौगुले तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद-शेतकरी आणि अधिकारी-कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य व प्रेरणा लाभली आहे.