
इचलकरंजी महानगरपालिकेस खासदार धैर्यशील माने यांच्या स्थानिक विकास निधीतून अत्याधुनिक जेटींग मशीन प्राप्त झाले आहे. Tata Motors कंपनीचे 712 LPT सक्शन कम जेटींग मशीन शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
या मशीनच्या मदतीने शहरातील ड्रेनेज लाईनमधील ब्लॉकेज काढणे, साचलेला मैला व दूषित पाणी सक्शनद्वारे बाहेर काढणे तसेच गाळ साफ करणे ही कामे अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
या नव्या जेटींग मशीनचे पूजन सोमवार, दिनांक ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि शिवसेना गटनेते रवींद्र माने यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला नगरसेवक योगेश पाटील, सयाजी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहाय्यक आयुक्त राम कांबळे, प्रमोद बचाटे, दिपक रावळ, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधीक्षक संजय शेटे तसेच इतर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मशीनमुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कामकाजात मोठी गती येणार असून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.