इचलकरंजीच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन; परिवहन मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा

इचलकरंजी शहरातील प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिवस्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान समितीच्या वतीने निवेदन सादर करून इचलकरंजी व परिसरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत प्रामुख्याने शिवतीर्थ दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी आवश्यक असलेल्या एस.टी. डेपोच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून ती जागा महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली. तसेच इचलकरंजीला MH51 क्रमांक मिळाल्यानंतरही कोल्हापूरच्या ट्रॅकवर वाहन पासिंग केली जात असल्याबाबत ती प्रक्रिया त्वरित थांबवून, इचलकरंजीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवरच सर्व वाहनांची पासिंग प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या मागण्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच इचलकरंजीतील वाहन पासिंगसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकची स्वतः पाहणी करण्याची विनंतीही करण्यात आली, जी त्यांनी मान्य केली. त्यानंतर तात्काळ त्या ट्रॅकची पाहणी करण्यात आली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

इचलकरंजीमध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर सर्व वाहनांची पासिंग प्रक्रिया सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी शिवस्मारक समितीचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीमुळे इचलकरंजीतील प्रलंबित प्रशासकीय प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *