इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘डॉग कॅचिंग व्हॅन’ची मागणी – आमदार फंडातून लवकरच व्हॅन उपलब्ध होणार

इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर उपायोजना करण्यासाठी त्यांना पकडण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी महानगरपालिकेने डॉग कॅचिंग व्हॅनची सुविधा उपलब्ध करावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. राहुल आवाडे विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले. दरम्यान, या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार फंडातून डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे.
निवेदनात, इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. टोळक्याने फिरणार्‍या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टोळक्याने भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत हल्ले केल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. शिवाय अशा दुर्घटनेत अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी जखमी झाल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेकडून अशा भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण व निर्जंतुकीकरण अशा उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र महानगरपालिकेकडे भटकी कुत्री पकडण्यासाठी आवश्यक डॉग कॅचिंग व्हॅन नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना पकडून उपाययोजना करण्यात विलंब होत आहे. शहरात आणखीन एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहेत. त्यासाठी डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर आयुक्त पाटील यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगत लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
दरम्यान, या संदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी लवकरच आमदार फंडातून अशा व्हॅनची व्यवस्था करुन देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी डाॅ राहुल आवाडे विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, शहराध्यक्ष फहिम पाथरवट, सरचिटणीस ओमकार मगदूम व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *