पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं ४० वर्षीय तलाठ्यानं २० वर्षांच्या एक कॉलेज तरुणीसोबत आत्महत्या केली आहे. त्यांनी कोकणकड्यावरून जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहे. मृत्यूपूर्वी दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात लावलेली कार आणि त्याच परिसरात आढळलेल्या चपलांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक तलाठी आणि कॉलेजची तरुणी अशाप्रकारे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असं आत्महत्या पावलेल्या दोघांची नावं आहेत. मयत रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. तर रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबतची एक सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या का केली, याचा सविस्तर खुलासा सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्यांनी आपल्या पत्नीसह तिच्या घरच्यांविरोधात गंभीर आरोपही केले आहेत.