महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘हास्य धमाका’ या कार्यक्रमाने महानगरपालिका वर्धापन दिनाचा समारोप

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या निमित्ताने आयोजित सर्वच
कार्यक्रमांमध्ये शहरवासीयांनी सहकार्य करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे.
महानगरपालिका वर्धापन दिनाचा समारोपीय कार्यक्रम रविवार दिनांक २९ जून रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण असलेला हास्यजत्रा या टीव्ही मालिकेतील कलाकार अरुण कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, याचबरोबर आकांक्षा कदम, माया शिंदे, सपना राजेश हेमन, अक्षता सावंत, धनश्री दळवी, सुनील जाधव, संदीप डवरे, जयवंत भालेकर या बहुसंख्य कलाकारांच्या सहभागातून हास्य धमाका इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे आमदार डॉ.राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि सहभागी कलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आयुक्त यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजी महानगर पालिका कामकाजाचा थोडक्यात आढावा घेऊन भविष्यकालीन महत्त्वपूर्ण योजनांचा आराखडा सादर करून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ राहुल आवाडे यांना केले.
आमदार डॉ राहुल आवाडे यांनी याप्रसंगी बोलताना इचलकरंजी शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्वच स्पर्धांच्या विजेत्या स्पर्धकांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच
या महिन्यात आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमाचे प्रायोजक संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या वृक्षारोपणासाठी आमदार राहुल आवाडे यांनी गोल्ड विंग फौंडेशनच्या माध्यमातून १०००० रोपे महानगरपालिकेस दिलेली आहेत. याकरिता महानगरपालिकेकडून आयुक्त यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमात सपना हेमन आणि अक्षता सावंत यांनी हिंदी मराठी गीते सादर करून तर आकांक्षा कदम, माया शिंदे आणि धनश्री दळवी यांनी हिंदी गीतांवर बहारदार नृत्य विष्कार आणि मराठी लावण्या सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या कॉमेडी किंग अरुन कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनमुराद हसविले.
आजच्या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महानगर पालिकेकडून नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये तसेच लॉन मध्ये मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रम पाहण्याची सोय केली होती.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करणेत आलेल्या सर्व कार्यक्रमामध्ये तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सहकार्य केले बद्दल आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.राहुल आवाडे यांचेसह शहरातील सर्व सामाजिक स्वयंसेवी- संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, सर्व प्रायोजक यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *