वंचित मुलांसाठी आशेचा दीप—श्रीमान योगी फाउंडेशनच्या ‘आनंदी शाळे’च्या नूतन इमारतीचे १० डिसेंबरला उद्घाटन

समाजातील वंचित आणि गरजू मुलांना शिक्षण, संस्कार आणि संधी देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या श्रीमान योगी फाउंडेशनच्या ‘आनंदी शाळे’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन बुधवार १० डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी ९.४५ वाजता बीएसएनएल ऑफिसशेजारील महात्मा गांधी कन्या विद्यामंदिर येथे आयोजित सोहळ्यात नव्या जागेचा वापर अधिकृतपणे सुरू होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष कौशिक मराठे यांनी दिली.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गोविंद ढवळे, महापालिका उपायुक्त नंदू परळकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. राजेश पवार आदींसह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

   आनंदी शाळेचा उद्देश केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर मुलांमध्ये आत्मविश्वास, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सामाजिक जाण निर्माण करणे हा आहे. नवीन इमारतीमुळे अधिक मुलांना शिक्षणाची संधी मिळेल, असे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

   या उपक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यावेळी प्रमोद सपाटे, माधुरी लोले, रोहिणी परीट, स्नेहा मराठे, प्राजक्ता कुलकर्णी, अशोक जाधव, निलकंठ गोसावी, राधेश्याम व्यास, आदित्य मराठे, विनायक माळी, गणेश शिंदे, महावीर भंसाली, इराण्णा सिंहासने, मधुमती रानडे यांच्यासह फाउंडेशनमधील सदस्यांनी योगदान दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *