
इचलकरंजी महानगरपालिका परिवहन समितीच्या वतीने आज सोमवार, दिनांक ३० मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांनी भूषवले होते. बैठकीत शहरात सुरू होणाऱ्या ई-बस सेवेसंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
ई-बस सेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी बस मार्ग निश्चित करणे, विविध ठिकाणी बस थांबे निश्चित करून त्यांची उभारणी करणे, प्रवाशांसाठी तिकीट दर ठरविणे, आधुनिक सुविधांनी युक्त ई-बस स्थानक उभारणे तसेच या सेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती करणे अशा अनेक मुद्द्यांवर समितीमध्ये विस्तृत चर्चा झाली. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बैठकीनंतर उपमहापौर अनिल डाळ्या, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक तसेच परिवहन समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष ई-बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली. यावेळी ई-बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या प्रसंगी मागासवर्गीय समिती सभापती रुबन आवळे, प्रभाग समिती सभापती नंदकुमार पाटील, नगरसेवक संतोष शेळके, ओंकार सुर्वे, सयाजी चव्हाण, नगरसेविका सुरेखा जाधव, शशिकला कवडे, समिती सदस्य अरुण कुंभार, उपायुक्त नंदू परळकर, प्रमोद बचाटे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.