
पंचगंगा नदी प्रदुषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीसह तीन ठिकाणी झेडएलडी सीईटीपी (नवीन सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) उभारणीसाठीची 610 कोटी रुपयांची निविदा शासनाने मंजूर केली आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अंतर्गत इचलकरंजी आणि लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाची सुधारणा, उन्नतीकरण आणि क्षमता वाढविणे त्याचबरोबर यड्राव ता. शिरोळ येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (झेडएलडी सीईटीपी) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदुषण रोखण्यासह ती प्रदुषणमुक्त करण्यास मोठी मदत होणार असल्याचे नमुद करत आमदार आवाडे यांनी, कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावांतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सातत्याने प्रदूषित होत आहे. पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. प्रदुषणमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत एमआयडीसीकडून आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या अंतर्गत इचलकरंजी शहर व परिसरात तीन अत्याधुनिक झेडएलडी सीईटीपी प्रकल्प उभारण्यास उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या तीन विभागांकडून मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी 25 टक्के आणि उद्योग विभागाकडून 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर हे प्रकल्प राबविणेची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे देण्यात येणार आहे.
मे महिन्यात विविध 700 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीत आले असताना या कामांसोबत प्रलंबित विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने प्रोसेसमधून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर पडणार्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषित होत असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामुळे नदी प्रदुषणासह प्रक्रिया केल्यानंतर शेतीसाठी दिले जाणारे पाणी देणे बंद झाले होते. प्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि तत्कालीन नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांनी क्लस्टरच्या माध्यमातून शहरात 12 एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारला आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या प्रोसेस उद्योगाचे पुनरुज्जीवन झाले. आता तंत्रज्ञान बदलत चालले असून त्यादृष्टीने या सीईटीपी प्रकल्पांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने टाकवडे वेस परिसरात 488 कोटी रुपये खर्चाचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. आता औद्योगिकीकरणातून जाणार्या पाण्यातून होणारे प्रदुषण रोखण्यासाठी झेडएलडी प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत 12 एमएलडी क्षमतेचा असलेला प्रकल्प 15 एमएलडीचा, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 3 एमएलडी क्षमतेचा असलेला प्रकल्प 5 एमएलडीचा आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत 5 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 609.58 कोटी रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित होती. त्याला शासनाने मंजूरी दिली असून हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा प्रदुषणमुक्त होणार आहे. पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखून ती प्रदुषणमुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व शासनाचे आमदार आवाडे यांनी आभार मानले. पंचगंगा नदी लवकरात लवकर प्रदुषणमुक्त करुन शहरासह ग्रामीण भागासाठी पंचगंगेचे पाणी उपयुक्त ठरेल हेच ध्येय असल्याचेही आमदार आवाडे यांनी नमुद केले.
आमदार आवाडे यांची ऑनलाईन पत्रकार परिषद
इचलकरंजी परिसरासह पंचगंगा नदीकाठावरील गावांसाठी महत्वाचा असलेला नदी प्रदुषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात राज्य शासनाने सोमवारी मंजूरी दिली. या शासन निर्णयाची माहिती देण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी थेट ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असलेने आमदार आवाडे हे मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांशी ऑनलाईन संपर्क साधत ही महत्वपूर्ण माहिती दिली.