
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती अर्थात ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून हातकणंगले तालुक्यातील ‘अ’ वर्ग वाचनालय असणाऱ्या आपटे वाचन मंदिरास श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मधील इ .७ वी च्या विद्यार्थिनीं,प्रत्येक वर्गाच्या ग्रंथालय प्रमुख यांनी अभ्यास भेट दिली.

सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांच्या उपस्थितीत एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापिका यांनी ग्रंथालयाचे महत्व व जीवनातील पुस्तकांचे महत्त्व सांगितले. आपटे वाचनालयातील सेवक के. बी. पंढरपुरे यांनी सर्व वाचनालय फिरून इंग्रजी विभाग, हिंदी विभाग, कलादालन आदी विभागांची माहिती विद्यार्थिनींना सांगितली. बालविभागात बसून विद्यार्थिनींनी पुस्तके वाचण्याचा आस्वाद घेतला.

त्यानंतर आपटे वाचन मंदिराचे कार्यवाह एम्. डी. पुजारी सरांनी आपल्या अमोघ वाणीने आपटे वाचन मंदिराचा इतिहास विद्यार्थिनींना सांगितला, विद्यार्थिनींना गोष्ट सांगून पुस्तके वाचण्यास उद्युक्त केले. आपणा सर्वांना हे ८० हजार पुस्तकांचे दालन वाचनाचा लाभ घेण्यास खुले आहे हे प्रामुख्याने नमूद केले. तसेच वाचनालयातील ग्रंथालय सेवकांचा पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका व्ही. एस लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक डी. डी. कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले तसेच ग्रंथपाल एस. एस. नेजे यांनी आभार मानले.