‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित

मुंबई: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनिय कार्यासाठी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यासाठी राज्यभरातून प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील २० अग्रगण्य संपादकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही आज ४० हजार सभासदांसह देशातील सर्वात मोठी संघटना बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ७८ देशांपर्यंत या संघटनेचे जाळे पसरले असून, पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासोबतच समाजात विधायक बदल घडवणाऱ्या ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा विडा संघटनेने उचलला आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार्याने येत्या १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या पुरस्कारांचे दिमाखदार वितरण सोहळा पार पडणार आहे.

सकारात्मक पत्रकारिता पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित किंवा प्रसारित झालेल्या किमान ४२ किंवा त्यापेक्षा जास्त थेट परिणामकारक बातम्या वा लेखांचे संकलन असणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक विभागातून एक जिल्हा, एक तालुका तसेच उर्दू विंग, साप्ताहिक विंग, महिला विंग, डिजिटल विंग आणि रेडिओ विंग मधून प्रत्येकी एका सदस्याची निवड केली जाईल. विशेष म्हणजे, पारदर्शकता राखण्यासाठी संघटनेचे मुख्य चार पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव) या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. या निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी चंद्रमोहन पुप्पाला, संजय आवटे, सारिका महोत्रा आणि अजितदादा कुंकूलोळ हे अनुभवी मार्गदर्शक काम पाहणार आहेत. इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव सादर करताना संबंधित संपादक, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षांचे शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे. हे सर्व प्रस्ताव ‘व्हॉईस ऑफ मीडिया मुख्य कार्यालय,पत्ता: रीजेंट चेंबर २०८, १ ला मजला, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ या पत्त्यावर ५ मार्च पर्यंत पाठवायचे आहेत. पत्रकारितेव्यतिरिक्त, महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच व्यक्तींना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि राज्य शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या भागात राज्यासाठी, पत्रकार, पत्रकारितेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींची प्रस्तावही नागरिकांनी आणि पत्रकारांनी पाठवावेत, असे आवाहन संघटनेने, आणि राज्य सरकार केले आहे.
या उपक्रमासाठी राज्य शासनाकडून डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष आयुष्यमान भारत समिती) व अनिल म्हस्के (मुख्य प्रदेशाध्यक्ष ‘व्हॉईस ऑफ मीडिया’), आबीद दुलेखान (प्रदेशाध्यक्ष उर्दू विंग), रश्मी मारवाडी, सविता चंद्रे (प्रदेशाध्यक्ष महिला विंग), वामन पाठक, अब्दुल कईम (प्रदेशाध्यक्ष साप्ताहिक विंग) इरशाद शेख, अश्विनी पुरी (प्रदेशाध्यक्ष डिजिटल विंग) इरफान पठाण (रेडिओ विंग) यांसह संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील पत्रकारांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सकारात्मक विचारांची पेरणी करणाऱ्या पत्रकारांचा हा गौरव महाराष्ट्राच्या पत्रकारितेत एक नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.