
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या पुढाकाराने राज्यातील उत्पादनाखालील व उभारणीतील सर्व सहकारी सूत गिरण्यांच्या विविध अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा झाली. महासंघाचे अध्यक्ष अशोक एम. स्वामी यांनी सहकारी सूत गिरण्यांच्या अडचणी वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या

बैठकीत राज्यातील सूत गिरण्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावर सकारात्मक दखल घेत अधिवेशन काळात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांच्या सचिवांसह उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीस माजी मंत्री व आमदार नितीन राजळे, आमदार अशोक माने, आमदार प्रताप अडसड, उपाध्यक्षा साविता सोनवणेकर, संचालक किसनराव कुराडे, माजी मंत्री रमेश बंग, रणजित देशमुख, विरेंद्र गजभिये, सचिव संभाजी देसाई तसेच तांत्रिक अधिकारी अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मागासवर्गीय सूत गिरण्यांच्या प्रश्नांवर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे (IAS) यांच्या उपस्थितीतही चर्चा करण्यात आली. सर्व अडचणी ऐकून घेऊन अधिवेशन काळात संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
या निर्णयामुळे राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे