
आमदार आवाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ असलेल्या तेरापंथी चौक येथे मुख्य चौकात एअरटेल (Airtel) कंपनीमार्फत गेल्या दीड दोन महिन्यापासून केबल जोडणी कामाकरिता केलेल्या खोदकामामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या रिंगरोड तेरापंथी चौक परिसरात एअरटेल कंपनीकडून हायस्पीड इंटरनेट वायर जोडणीसाठी रस्ते खोदण्याचे काम हाती घेण्यात आले मात्र, खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवला जात नसल्याने या ठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे हे खोदकाम आमदार आवाडे यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असूनही प्रशासकीय दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

खोदकामामुळे रस्ता अरुंद झाला असून, सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच शेजारी ट्रान्सपोर्ट कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर लावलेल्या ट्रक, छोटा हत्ती यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे,त्यामुळे भागात अपघातांचे सावट निर्माण झाले आहे .तसेच खोदकामामुळे परिसरात धुळीचे लोट उसळत असून, जवळच असलेल्या दुकानदारांना आणि रहिवाशांना श्वसनाचे त्रास होत आहेत.व रस्त्यावरील खोदकामामुळे ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण झाले असून, स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेकदा तक्रार करूनही कंपनीकडून खोदकाम केलेल्या जागेचे तातडीने डांबरीकरण किंवा दुरुस्ती केली जात नाही. महापालिकेने संबंधित कंपनीला रस्ता दुरुस्तीचे कडक निर्देश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.जर येत्या काही दिवसांत रस्ता पूर्ववत केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
